My Mahanagar Team March 17, 2021 5:57 PM Jalgaon Share
महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसीलच्या चौगाव गावाजवळ २,००० वर्षांपूर्वीची अत्यंत गुप्त आणि काही पुरातन लेण्या आढळल्या आहेत. इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी भेट देऊन अधिक माहिती मिळवली. यावेळी माहीत असलेल्या लेण्यांव्यतिरिक्त आणखी एक सातवाहनकालीन लेणी आणि उत्तर मराठाकालीन नवीन शिलालेख येथील शिव मंदिरावर असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्याच्या उत्तर भागातील पर्वतरांगांमध्ये असलेल्या चौगाव येथे गवळी राजांनी बांधलेला किल्ला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक व परिसरातील नागरिकांना आहे. परंतु, तेथील लेणीसह काही पुरातन ऐतिहासिक गोष्टी कोणत्या काळातील आहे, याची कोणालाही माहिती नव्हती किंवा अद्याप कोणत्याही संशोधनात त्याचा उल्लेखही केल्याचे दिसले नाही.
डोंगरात काहीतरी खोदल्यासारखे इतिहास संशोधक बोबडे आणि त्यांच्या पथकाच्या निदर्शनास आले मात्र तेथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्याने झाडाझुडपांचा व खडकाचा आधार घेत ते तेथे पोहोचले. यावेळी तेथेही एक लेणी असल्याचे त्यांना लक्षात आल्याची माहिती बोबडे यांनी डॉ. तेजस गर्गे यांनी दिली. तर निसर्गप्रेमी विश्राम तेले यांनी असे सांगितले की, आम्ही ३० वर्षांपासून येथे येतोय; पण याबाबत कधीच लक्षात आले नाही.
इतिहास संशोधक बोबडे यांनी या पुरातन लेणीचे आणि परिसरातील काही फोटो आणि माहिती तेलंगणा पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. ई. शिवांगीरेड्डी यांना हैदराबाद येथे पाठविली. या संशोधनासाठी बोबडे यांनी माजी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग ई. शिवांगीरेड्डी यांच्यासह आंध्र प्रदेश सरकारची मदत घेतली. यासह त्यांनी असेही सांगितले की, “हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे आणि अधिक अभ्यासाची गरज आहे,” तेलंगणा पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. ई. शिवांगीरेड्डी यांना ज्यावेळी हे फोटो मिळाले तेव्हा त्यांना कोणतीही अधिक माहिती नसताना देखील त्यांनी हे सर्व स्थापत्य काम सातवाहन काळातील आहे आणि ते साधारण दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले. –
चौगावपासून साधारण दोन किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याच्या शेजारी शिव मंदिराच्या भिंतीवर मराठा कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यात निर्माण करण्यात आलेले व मंदिरावर एक अद्याप वाचन न केला गेलेला शिलालेखही आढळल्याचे सांगितले जात आहे. यासह मिळालेल्या माहितीनुसार, या लेणीत वर्षानुवर्षांपासूनच्या पाण्याच्या टाक्या जसेच्या तसे दिसून येते. त्याचे खांब, खोदकाम हे पाहून, हा स्थापत्य प्रकार सातवाहन काळातील आहे.