जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगावनजीक सातवाहन कालीन लेणीचा शोध लागला आहे. इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांनी या नव्या लेणीचा शोध लावला आहे. या ठिकाणी गवळी राजांनी बांधलेला किल्ला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक व परिसरातील नागरिकांना आहे.
By: निलेश झालटे, एबीपी माझाअपडेटेड: 15 March 2021, 1:59 PM (IST)

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चौगावनजीक सातवाहन कालीन लेण्यांचा शोध लागला आहे. इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांनी या नव्या लेण्यांचा शोध लावला आहे. या ठिकाणी गवळी राजांनी बांधलेला किल्ला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक व परिसरातील नागरिकांना आहे. पण इथे असलेली लेणी व टाके हे कोणत्या काळातील हे कोणालाही सांगता येत नव्हते वा त्याचा अद्याप कुठेही साहित्यात वा संशोधनात उल्लेख केलेला मिळत नाही. इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे, अशोकराव पाटील, अथर्व बोबडे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी भेट दिली. माहित असलेल्या लेण्या वगळता अजून एक सातवाहन कालीन लेणी आणि उत्तर मराठा कालीन नवीन शिलालेख येथील शिव मंदिरावर प्राप्त झाला आहे, अशी माहिती भुजंगराव बोबडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना दिली.

हे संशोधन समोर येताच बोबडे यांनी काल रात्री महाराष्ट्र शासनानाच्या पुरातत्व विभागाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांना याबाबत कळवले आहे. बोबडे हे स्वत: चौगाव येथील किल्ला पाहण्यासाठी गेले असता त्यांनी ही लेणी आढळून आली. दुसरी लेणी-पाण्याचे टाके म्हणून ओळखले जाते ते पाहायला मिळाले. तेव्हा डोंगरात अजूनही काहीतरी खोदल्यासारखे त्यांना दिसून आले. तिथं जाण्यासाठी कसलाही रस्ता नव्हता. पण झाडाझुडुपांचा व खडकाचा आधार घेत भुजंग बोबडे हे तिथे पोहोचले. त्यावेळी तिथंही एक लेणी आहे हे लक्षात आले. सोबत असणारे गावातील डॉ गोपाळ पाटील व निसर्ग प्रेमी विश्राम तेले यांनी देखील सांगितले की, आम्ही 30 वर्षांपासून इथं येतोय पण आम्हालाही कधीच हे लक्षात आले नाही.

उत्तर मराठा कालीन शिलालेखही आढळले
चौगाव या गावापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याच्या शेजारी शिव मंदिराच्या भिंतीवर मराठा कालखंडाच्या शेवटच्या टप्प्यात निर्माण करण्यात आलेल्या मंदिरावर एक अद्याप वाचन न केला गेलेला शिलालेखही मिळाला आहे. ज्याचे वाचन होणे बाकी आहे, असं बोबडे यांनी सांगितलं.

या लेण्यांच्या संवर्धनासाठी जळगाव जिल्हा ऐतिहासिक वारसा संवर्धन व पर्यटन विकास समिती ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत व ज्यात पुरातत्व विभागाचे संचालक आणि भुजंग बोबडे हे देखील सदस्य आहेत. त्या समितीच्या व पुरातत्व विभागाच्या मदतीने हे संवर्धन करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.