9 वर्षांपूर्वी
भुजंग बाबडे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी 2 मे 1983 रोजी झाला. त्यांचे वडील रामराव प्रल्हाद बोबडे हे लातूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते. भुजंग बोबडे लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालयात झाले. दहावीच्या वर्गात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी 12 वी सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा महाविद्यालयात दुसरा क्रमांक आला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा या तालुक्याच्या गावच्या महाराष्ट्र महाविद्यालयात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आर्थिक अडचणींमुळे त्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडावे लागले. त्यांनी त्याच महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. या घटनेनंतर त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. कला शाखेतून शिक्षण घेऊन काही तरी मोठे काम करायचे, असा संकल्प बोबडे यांनी त्याच वेळी केला होता. बीए ची पदवी घेतल्यानंतर महाराष्टÑ उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथून इतिहास विषयात एमए ची पदवी घेतली. या नंतर लागलीच उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात 1 वर्ष सीनियर लेक्चरर या पदावर नोकरी केली. इतिहास विषयातील आवड आणि संशोधन करण्याच्या तीव्र इच्छेतून त्यांनी लातूर, नांदेडसह कर्नाटक, हैदराबाद आदी भागात विविध पुरातन वस्तूचा शोध घेऊन संग्रह करण्यास सुरुवात केली होती.
अखेर त्यांचे भाग्य उजळले
नांदेड जिल्ह्यातील विविध किल्ले व पुरातन वास्तुचा प्रचंड अभ्यास असल्यामुळे 2007 मध्ये राष्ट्रीय पांडुलिपी मिशनमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. या उपक्रमात जुन्या काळातील पुरातन वस्तू व ग्रंथ जतन करण्याचे काम केले जात होते. त्याच बरोबर त्यांचे नांदेड जिल्हा पुरात्त्व विभागात विभागप्रमुखपदी निवड झाली. याच वेळी त्यांचे वैयक्तिक संशोधनाचे कामही सुरू होते. नांदेड जिल्ह्यातील मठ, मंदिरे, दर्गा, मस्जीद यांचे सर्वेक्षण केले. तेथील शिवलिंग बादशाह मठातून चालुक्यकालीन अवशेष त्यांनी मिळवले. यात महत्त्वाचे म्हणजे औरंगजेब बादशहाचे 10 ताम्रपट त्यांनी शोधून काढले. याचदरम्यान हैदराबाद येथील दख्खन पुरातत्त्व आणि सांस्कृतिक संशोधन केंद्रात काम करण्याची त्यांना मोठी संधी मिळाली आणि त्यांचा संशोधनाचा प्रवास संपूर्ण भारतभर होऊ लागला. अल्पावधीतच त्यांनी 2008 मध्ये या केंद्रात हस्तलिखित विभागाचे प्रमुखपदी पदोन्नती मिळवली. संशोधनाचा प्रवास करीत ते जून 2010 पासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गांधी संशोधन केंद्रात समन्वयकपदी कार्यरत आहेत.
वैयक्तिक संग्रहाचा खजिना
भुजंग बोबडे यांनी विविध ठिकाणी काम करीत असताना आपल्या वैयक्तिक संशोधनाचे कार्य सुरूच ठेवले होते. प्रत्येक ठिकाणी ते पुरातन वस्तूंचा संग्रह करण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढीत असे. आजपावेतो त्यांच्याकडे स्वर्ण अक्षरातील कुराण आहे. अशा कुराणाच्या संपूर्ण जगात फक्त 4 प्रती आहेत. त्यातील एक प्रत श्री. बाबडे यांच्याकडे आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या सीमावर्ती भागातून त्यांनी 14 हजार हस्तलिखित, 7 हजार पुरातन कागदपत्रे, 10 ताम्रपट असा संग्रह केला आहे. तारीख ए ताज, तारीख ए दख्खन, तारीख ए हिंद, फारसी वचन, वेद वचन, प्रतापदुर्ग महात्म्य, अहिल्याबाई होळकर यांच्या जहागिरीचे पत्र, 600 वर्षे चाललेला न्यायनिवाड्याची प्रत, सातवाहनकालीन पाण्यावर तरंगणारी वीट, अश्मयुगीन हत्यारे, अलंकार आदी वस्तंूचा संग्रह त्यांनी केला आहे. हा संग्रह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या खान्देश पुरालेखाभिगार व वस्तुसंग्रहालयात विद्यार्थी व संशोधकांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला आहे.
शोधनिबंध व पुस्तकांचे प्रकाशन
भुजंग बोबडे यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांचे वय सध्या 29 वर्ष आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर 28 शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच त्यांनी पुरातन वस्तूं संशोधनाच्या अभ्यासावरील स्वत:ची 13 पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत. सध्या ते पीएच.डी.चा अभ्यास करीत आहेत.